LIVE UPDATES

नॅशनल मोटारसायकल रॅलीचे सिंधुदुर्ग पोलिसांकडून स्वागत

अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा संदेश ; ४६ मोटारसायकलस्वारांचा सहभाग, सिंधुदुर्ग पोलिसांचे २२ बायकर्स होणार सहभागी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 10:45 AM
views 15  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता परेडच्या अनुषंगाने ‘नॅशनल मोटार सायकल रॅली-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे महाराष्ट्रात आगमन होत असताना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. ‘Fight Against Drugs’ हा संदेश देत निघालेली ही रॅली २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वा. च्या सुमारास गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि अमली पदार्थांविरोधातील जनजागृती हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. गोवा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप येथील पोलीस संघांतील एकूण ४६ मोटारसायकलस्वार या रॅलीत सहभागी झाले आहेत. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर बांदा, कुडाळ, ओरोस, कणकवली आणि खारेपाटण मार्गे रॅली रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांतून पुढे मुंबईच्या दिशेने जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही रॅली सुमारे १०७ किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.

बांदा-परबवाडी येथे रॅलीचे स्वागत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्वागत कार्यक्रमाच्या माध्यमातून रॅलीतील सहभागी पोलीस अधिकारी व मोटारसायकलस्वारांचे स्वागत करण्यात येणार आहे.

या रॅलीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील २२ मोटारसायकलस्वार बांदा येथून सहभागी होणार आहेत. रॅलीच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, त्याविरोधात समाजाने घ्यावयाची भूमिका आणि तरुणांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश दिला जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासह अमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी लोकसहभाग वाढविणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटारसायकल क्लब, बायकर्स क्लब तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मोटारसायकलींसह या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.