
दापोली : हिमालयातील दुर्गम घाटरस्ते, बर्फाच्छादित पर्वतशिखरे आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेत दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य आणि दापोली तालुक्यातील असोंड गावचे रहिवासी अभिजीत मयेकर यांनी हिमाचल प्रदेशातील ४०० हून अधिक किलोमीटरची सोलो सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. कोकणच्या किनारपट्टीवरून थेट हिमालयातील दुर्गम घाटांपर्यंत ४०० हून अधिक किलोमीटरचे अंतर आणि हजारो मीटरची उंची पार करताना त्यांना अनेक थरारक अनुभव मिळाले.
४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत त्यांनी पठाणकोट, धरमशाला, मंडी आणि मनाली असा सायकल प्रवास केला. स्वतःच्या सायकलवर आवश्यक सामान घेऊन, कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण केलेली ही त्यांची सेल्फ सपोर्टेड मोहीम होती. ‘क्लीन भारत, ग्रीन भारत, राईड क्लीन, ब्रिद क्लीन’ हा पर्यावरणपूरक संदेश देत त्यांनी हिमालयातील आव्हानात्मक घाटवाटा यशस्वीपणे पार केल्या.
अभिजीत मयेकर यांनी सांगितले की, पठाणकोट येथून त्यांच्या सायकल प्रवासाला सुरुवात झाली. या मोहिमेसाठी त्यांनी स्वतःची सायकल दापोलीहून खेडमार्गे मुंबईला नेली आणि तेथून रेल्वेने हिमाचल प्रदेशात पोहोचवली. प्रवासादरम्यान ऐतिहासिक नूरपूर किल्ला, मार्गावरील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकला, सुंदर कोरीवकाम असलेली मंदिरे आणि महालांचे अवशेष पाहण्याची संधी मिळाली. भाली गाव, शहापूर आणि मस्तपूर या ठिकाणांनाही त्यांनी भेट दिली.
टेलिव्हिजनवरून नेहमीच आकर्षित करणारे धरमशाला क्रिकेट स्टेडियम प्रत्यक्ष पाहण्याचा थरारही त्यांनी अनुभवला. गोपाळपूर येथील चहाचे मळे, पालमपूरमधून दिसणारी धौलाधार पर्वतरांगांची बर्फाच्छादित शिखरे आणि ऐतिहासिक बैजनाथ शिवमंदिर यांनी त्यांच्या प्रवासात विशेष स्थान मिळवले. बीर बिलिंग येथील पॅराग्लायडिंग लँडिंग पॉईंटवर आकाशात रंगीबेरंगी पक्ष्यांप्रमाणे झेपावणाऱ्या पॅराग्लायडर्सना उतरताना पाहण्याचा आनंदही त्यांनी घेतला.
जोगिंदर नगर येथील युनेस्कोच्या यादीत समाविष्ट ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आणि टॉय ट्रेन, तसेच ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शानन पॉवर हाऊस ही या मोहिमेतील आणखी काही महत्त्वाची ठिकाणे ठरली. जोहार घाटीतील झटिंगरीचा आव्हानात्मक टप्पा पार करताना शारीरिक क्षमतेची कसोटी लागली. या मार्गावरून दिसणारे पर्वतांचे विहंगम दृश्य, ३६० अंशांत पसरलेल्या धौलाधार पर्वतरांगा, डोंगरउतारांवरील फुट्टाखलसारखी छोटी खेडी आणि जुनी लाकडी हिमालयीन घरे यांनी त्यांना भुरळ घातली. हिमालयात यापूर्वी कधीही न पाहिलेला विलोभनीय सूर्यास्त अनुभवण्याची संधीही या प्रवासात मिळाली.
यानंतर मंडी शहरातून बियास नदीच्या सोबतीने संथ चढणीचा टप्पा पार करत त्यांनी पंडोह धरण, हनोगी माता मंदिर आणि पांगन गावाचा परिसर अनुभवला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सफरचंद, प्लम, नाशपाती, जरदाळू आणि डाळिंबाच्या बागा पाहत त्यांनी पतलीकुहलमार्गे मनाली गाठले. या संपूर्ण प्रवासात हिमाचल प्रदेशातील विविध भौगोलिक वैशिष्ट्ये, निसर्गाचे बदलते रंग आणि स्थानिक जीवनशैली जवळून अनुभवता आली.
या सायकल मोहिमेदरम्यान बदलते हवामान, रस्त्यावरील चढ-उतार, थंडी, वारा आणि पाऊस यांनी त्यांची कसोटी पाहिली. मात्र, हिमालयातील स्थानिक लोकांचा प्रेमळ पाहुणचार यामुळे हा प्रवास थकवणारा असला, तरी मनाला प्रचंड समाधान देणारा ठरला.








