LIVE UPDATES

नारूर येथे वादळाच्या तडाख्यात धर्मशाळेचे छप्पर उडाले

१ लाखाचे नुकसान ; नेरूरमध्ये भातपीकही जमीनदोस्त
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 13:32 PM
views 28  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ :  कुडाळ तालुक्यात १९ ऑक्टोबर रोजी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या धुवांधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. काल सायंकाळच्या सुमारास जवळपास पाऊणतास सुरु असलेल्या या वादळी वाऱ्यामुळे नारूर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरातील धर्मशाळेचे (भक्तनिवासाचे) छप्पर उडाल्याची घटना घडली असून, नेरूर परिसरात हाताशी आलेले भातपीक जमीनदोस्त झाले आहे.

नारूर गावातील महालक्ष्मी मंदिराशेजारील धर्मशाळा (भक्तनिवास) असलेल्या इमारतीला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, या धर्मशाळेचे छप्पर पूर्णपणे भिंतीतून निखळून एका बाजूला सटकले. या दुर्घटनेत धर्मशाळेतील पंखे, लाईट आणि छताचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे १ लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनी दिली आहे. नारूर परिसरातील सुरेश पारकर यांच्या घरावर सुपारीचे झाड पडले असून त्यांचे व सुरेश भागवत  यांचे देखील अंशतः नुकसान झालेले आहे. 

दुसरीकडे, नेरूर परिसरातील काही भागांत भातशेती पूर्णपणे कापणीवर आली होती. मात्र, काल सलग पाऊण तास चाललेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उभे भातपीक पूर्णपणे भुईसपाट (जमीनदोस्त) झाल्याचे स्थानिक गावकऱ्यांनी सांगितले. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे ऐन काढणीच्या वेळी शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.प्रशासनाकडून तातडीने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करावेत आणि बाधितांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.