८ वर्षे चकवा देणारा एटीएम चोर अखेर अटकेत

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 16, 2026 10:28 AM
views 54  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

मालवण : एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे तब्बल ३ लाख ४३ हजार ७०० रुपये काढून फरार झालेल्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आठ वर्षांनंतर जेरबंद केले. मनिष अंकुश परब (रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मालवण पोलीस ठाण्यात १८ सप्टेंबर २०१८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी मनिष परब याने फिर्यादी महिलेचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे ३ लाख४३ हजार ७०० रुपये काढले होते. त्यानंतर तो फरार झाला होता.

गेल्या आठ वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता. आरोपी असलेल्या मनिष परब याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या पथकाने आरोपीच्या पार्श्वभूमीची माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेतला. अखेर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वराळे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीला गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी मालवण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण देसाई, आशिष जामदार आणि अविनाश ओटवणेकर यांचा समावेश होता.