
सावंतवाडी : बाहेरचावाडा येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या बिहारी सेंट्रिंग कामगाराने घरातील स्वयंपाकाकरीता वापरण्यात येणाऱ्या चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. कृष्णा गोंड( वय ३५, रा बिहार )असे या कामगाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली त्यांनतर त्याला उपचाराठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टर यांनी घोषित केले. मयताचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त होणार असून हा घातपात आहे की आत्महत्या हे अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले.
याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावंतवाडी बाहेरचावाडा येथे भाड्याने तीन बिहारी कामगार राहत असून ते सेंट्रिंगचे काम करतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे कामावरून परत आले. यातील मयत कृष्णा गोंड, कामगार अमित कुमार व सहकारी कामगार धर्मेंद्र यांच्यासोबत पैशांचा हिशोब करत असताना अचानक कृष्णा हा उठून पाणी पिण्यासाठी म्हणून आतील किचनच्या खोलीत गेला.
मात्र, थोड्याच वेळात त्याच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून बाहेर असलेले दोन्ही कामगार यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यावेळी तातडीने टेंपोमध्ये घालुन त्याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट देत तपास केला. घरातील चाकूने मयताने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांच्या तपासात उघड होत आहे. तो चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी कामगार अमित कुमार व सहकारी कामगार धर्मेंद्र या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मयत कृष्णाचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे. त्यांनतर हा घातपात की आत्महत्या ? याचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.












