
देवगड : महावितरणच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान देवगड तालुक्यात विविध ठिकाणी वीज चोरीची एकूण १० प्रकरणे उघडकीस आली आहेत. कुणकेश्वर, पाळेकरवाडी, मोड, वानिवडे, टेंबवली आणि देवगड येथे ही प्रकरणे आढळून आली असून, संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
महावितरणच्या तपासणीत कुणकेश्वर गावातील वाळकेवाडी येथे एक, पाळेकरवाडी येथे दोन, मोड येथे तीन, वानिवडे येथे एक, टेंबवली येथे दोन आणि देवगड येथे एक अशी एकूण १० वीज चोरीची प्रकरणे निदर्शनास आली. अनधिकृत वीज जोडणी, वीज चोरी तसेच वीज मीटरमध्ये फेरफार करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
वीज चोरीमुळे नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर आर्थिक भार पडतो. तसेच वीज वितरण व्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर महावितरणने वीज चोरीविरोधातील तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
ग्राहकांनी वीज चोरीचे प्रकार करू नयेत. तसेच आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती महावितरणला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वीज चोरी हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून, दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
देवगड उपविभागात वीज चोरीविरोधातील मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. वीज चोरीला आळा घालून वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.











