
रत्नागिरी : दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा हा कोणत्याही प्रकारचा बागुलबुवा नसून स्वतःमधील क्षमता ओळखण्याची एक सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, निरोगी शरीर आणि शांत मन यांची जर अचूक सांगड घातली, तर यशाचे शिखर गाठणे मुळीच अवघड नाही. गुणवत्तेमध्ये सातत्य टिकवण्यासाठी केवळ तासनतास अभ्यास पुरेसा नसतो, तर त्यासाठी दैनंदिन वर्तनाची शिस्त आवश्यक असते, असे प्रतिपादन कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये एक भिती असते. माझा अभ्यास पूर्ण होईल का?, ऐनवेळी सगळे विसरलो तर काय होईल?, माझ्या निकालामुळे आई-वडिलांची मान शरमेने खाली जाईल का?, अशा प्रश्नांचे काहूर विद्यार्थ्यांच्या मनात घर करतो. परंतु या काळातच विद्यार्थ्यांच्या मनात यशाची नवी उमेद पेरण्याचे काम कोकण बोर्डाने केले. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून आत्मविश्वास निर्माण केला.
गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या उपक्रमांतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी थेट ऑनलाईन विशेष मार्गदर्शन सत्र झाले. पाचही जिल्ह्यांतील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत मोठ्या पडद्यावर हे थेट प्रक्षेपण एकाच वेळी दाखवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीवर फुंकर घालत स्पष्ट केले की, याप्रसंगी कोल्हापूर मंडळाचे सचिव गजानन उकिरडे, कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनीता गुरव, विभागीय शिक्षण मंडळाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पाचही जिल्ह्यांचे मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी अनुभवी शिक्षक श्रीराम टेके, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आणि धावपटू डॉ. राहुल फासे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कपिल लळीत यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी आभार मानले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








