LIVE UPDATES

कुडाळमध्ये सोमवारी 'दुर्गामाता दौड'चे आयोजन

१६ कर्तबगार महिलांचा होणार सत्कार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 19:21 PM
views 44  views

कुडाळ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ येथे सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता भव्य 'दुर्गामाता दौड'चे (पदयात्रा) आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात १६ कर्तबगार महिलांचा सत्कार तसेच कणकवली बिडवाडी येथील महिलांची लाठीकाठी, तलवारबाजी व दांडपट्ट्याची थरारक प्रात्यक्षिके सादर होणार आहेत.

कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला उन्मेषा दाभोलकर, पद्मा वेंगुर्लेकर, श्वेता बेलेकर-सावंत, भावना वेळकर, बंड्या सावंत, श्रीकृष्ण शिरोडकर, रमाकांत नाईक, विवेक पंडित, शिवम म्हाडेश्वर, आनंद वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भक्ती, शक्ती आणि धर्मजागृतीचा जागर

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गामाता दौड ही केवळ धावण्याची शर्यत नसून तरुण पिढीमध्ये भक्ती, शक्ती, सुसंस्कार आणि धर्मजागृती निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम आणि पदयात्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची, शौर्याची आणि विचारांची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा या दौडीचा मुख्य उद्देश आहे. सोमवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्री आई केळबाई मंदिर येथून दौडला सुरुवात होईल. श्री आई केळबाई मंदिर, कुडाळ बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून निघून जिजामाता चौक येथे दौडचा भव्य समारोप होईल.

दौडच्या समारोपप्रसंगी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ कर्तबगार महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच कणकवली बिडवाडी येथील महिलांकडून लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली जातील. कार्यक्रमादरम्यान इतरही विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रम राबवले जाणार आहेत.

या प्रेरणादायी पदयात्रेत कुडाळ परिसरातील महिला, पुरुष तसेच तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.