LIVE UPDATES

दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्यांवर प्रकाश

डॉ. बाळकृष्ण लळीतांचे अनुभवकथन संपन्न
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 20:06 PM
views 11  views

कुडाळ : "मालवणी बोली सहित्याचे संशोधन करताना येथील देवदेवस्की, संत-महात्मे, अलौकिक आणि गुढ वाटणारी स्थळे, लोकसंस्कृती संदर्भात मी घेतलेले अनुभव शब्दबध्द करावेत असे मनाला सारखे वाटत असे. शेकडो लिखित व मौखिक परंपरेतील संदर्भ हाताशी होते म्हणून मी लिहित राहिलो. समाज माध्यमांतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद व पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादामुळे 'दक्षिण कोकणच्या अध्यात्मिक रहस्ये ' ग्रंथ रुपाने प्रकाशित झाली. मनाला खूप आनंद झाला नी समाधान मिळाले," असे भावपूर्ण उद्गार डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी व्याख्यानात व्यक्त केले.

कुडाळ हायस्कुल जवळच्या मराठा मंडळ सभागृहात सचिन मणेरीकर यांनी भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. उद्याचा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असुन वाचकांचा ग्रंथ खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या निमित्ताने बाळकृष्ण लळीत यांच्या 'दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्ये लिहिण्याचे अनुभव कथन असा विषय व्याख्यानाचा होतो. पहिल्या व दुस-या खंडात एकुण ५० प्रकरणे असून देवचार, बारापाच देवस्की, शोध वेताळ आणि देव रवळनाथाचा 'या व अशा अनेक विषयावर लेखन करतानाचे अनुभव कथन केले. हे अनुभव ऐकताना श्रोते भारावून गेले होते.

सुरवातीला वाचनवाट ग्रंथ प्रदर्शन व दालनाच्या संचालिका मुग्धा शेवाळकर यांनी परिचय करुन स्वागत केले तर ग्रंथ भेट देऊन सचिन मणेरीकर यांनी सत्कार केला. ॲड अंजली मुतालिक, सुनील सकरे, सरवटे, सौ. सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नांना लळीत यांनी समर्पक उत्तरे दिली. या व्याख्यानाला व ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. उद्या सकाळी ९ ते सायंकाळपर्यंत प्रदर्शन चालू असेल अशी सचिन मणेरीकर यांनी माहिती दिली.