LIVE UPDATES

ओटवणेचा ४५० वर्षांची परंपरा लाभलेला शाही दसरोत्सव १९ व २० ऑक्टोबरला

वर्षातून एकदाच सुवर्णतरंगांचे दर्शन!
Edited by:
Published on: October 17, 2026 18:45 PM
views 23  views

सावंतवाडी : सुमारे साडेचारशे वर्षाची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावचा प्रसिद्ध शाही दसरोत्सव १९ व २० ऑक्टोबरला साजरा होत आहे. खंडेनवमी आणि विजयादशमी असे दोन दिवस साजरा होणाऱ्या या दसरोत्सवात वर्षातून एकदाच दर्शन होणाऱ्या सुवर्णतरंगांच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, कोल्हापूर परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते. 

दसरोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी रवळनाथासह देवस्थानच्या देवतांना भरजरी वस्त्रांसह सुवर्णालंकारांनी सजविल्यानंतर तिन्ही तरंगांना सप्त पितांबरीच्या वस्त्रांनी सजविण्यात येणार आहे. सायंकाळी सुवर्ण तरंगासह सवाद्य पालखी प्रदक्षिणा केल्यानंतर शिवलग्न सोहळा, त्यानंतर भाविकांनी सोने म्हणून आपट्याची पाने लुटल्यानंतर तिन्ही तरंग देवतांच्या साक्षीने महिलांचे इंगळे स्नान होणार आहे.

दुसऱ्या दिवशी मंगळवारी सायंकाळी सुवर्ण तरंगाची खेम सावंत समाधी भेट व गाव रखवाल कौलाने या दोन दिवसांच्या दसरोत्सवाची सांगता होणार आहे. या राजेशाही उत्सवात भाविकांना राजसत्ता आणि वैभवाचा साज पाहता येणार आहे. तसेच देवस्थानचे सुवर्ण वैभव वर्षातून एकदाच पाहता येते असल्याने 'याची देही याची डोळा' हे सुवर्ण वैभव पाहून डोळ्यांचे पारणे फिटणार आहे.