LIVE UPDATES

खेर्डी एमआयडीसीत ३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

संशयित रोहिदास पवारला अटक; कारसह ७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 19:39 PM
views 15  views

चिपळूण : तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी परिसरात चिपळूण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत तीन ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले. या कारवाईत अंमली पदार्थांसह सुमारे सात लाख रुपये किमतीची सुझुकी एर्टिगा कारही जप्त करण्यात आली. या प्रकरणी पिंपळी खुर्द येथील संशयित रोहिदास पवार (वय २८) याला अटक करण्यात आली असून, एकूण सात लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.२६ वाजण्याच्या सुमारास खेर्डी एमआयडीसीतील पी. डी. इन्फ्रा कंपनीसमोरील रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. यावेळी संशयित रोहिदास पवार याच्या ताब्यातील प्लास्टिकच्या पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाचे लहान तुकडे आणि पावडर स्वरूपातील एमडी अंमली पदार्थ आढळून आला. पाऊचसह या पदार्थाचे वजन तीन ग्रॅम असून, त्याची किंमत १२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याशिवाय, एमएच ४६ झेड ७६८२ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जुनी वापरती सुझुकी एर्टिगा कार, अंदाजे सात लाख रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली. या कारवाईमुळे खेर्डी एमआयडीसी परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप सदाशिव माणके (४२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३८ वाजता अटक केली.

आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहिदास पवार याच्याविरुद्ध यापूर्वी चिपळूण पोलीस ठाण्यात चोरी, लूटमार, मारहाण तसेच अंमली पदार्थांशी संबंधित विविध गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणाकडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी विशेष लक्ष दिले आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.