LIVE UPDATES

नूतन भाजी मार्केट इमारतीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

श्री नवलाई देवी भाजी मंडई नाव देण्याची सूचना; जुन्या विक्रेत्यांवर अन्याय होऊ न देण्याचे निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 19:50 PM
views 13  views

रत्नागिरी : येथील बाजारपेठेतील नागरिकांच्या भावनांचा आदर करून या भाजी मार्केटला ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव देणे योग्य ठरेल. येथील स्टॉलचे वाटप करताना जुन्या भाजी मंडईतील स्टॉलधारकांना विश्वासात घेऊन, अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जावी. या प्रक्रियेत जुन्या व्यावसायिकांवर आणि गरजू व्यक्तींवर कोणताही अन्याय होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.

नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत बाजारपेठ हद्दीतील जुन्या भाजी मार्केटच्या नूतन इमारत बांधकामाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व फित कापून करण्यात आले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, "सुमारे ३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सुसज्ज इमारतीमुळे नगरपालिकेचे कामकाज अधिक सुसूत्रित होईल आणि नागरिकांना आधुनिक सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल."