
कुडाळ : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांचे वतीने आयोजित दुर्गामाता दौडच्या निमित्ताने दौडमधून शौर्य, भक्ती आणि धर्मजागृतीचा संदेश देण्यात आला लाठीकाठी, तलवारबाजी प्रात्यक्षिकांनी सर्व मंत्रमुग्ध झाले. यावेळी १६ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. आजच्या संगणक युगात महिलांनी स्वरक्षणासाठी लाठीकाठी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवप्रेमी सदस्य उन्मेषा दाभोलकर यांनी केले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त 19 ऑक्टोंबर रोजी कुडाळ येथे दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उन्मेषा दाभोलकर, मनोज वालावलकर, जेष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, विवेक पंडित, रमाकांत नाईक, शिवम म्हाडेश्वर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, अंजली वालावलकर, रेवती राणे, धारकरी गोपाळ भिसे, स्वरूप वाळके, अदिती सावंत ,कीर्ती पाटील, पुजा कुडव, सानिका सावंत, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत, रोहिणी घाडी, पद्मा वेंगुर्लेकर,आनंद वेंगुर्लेकर तसेच महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दुर्गादौडीच्या निमित्ताने रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून या दुर्गादौडला प्रारंभ करण्यात आला. आई केळबाई मंदिर येथून कुडाळ बाजारपेठ शिवाजीनगर ते जिजामाता चौक अशी ही दौड काढण्यात आली. यावेळी कणकवली बिडवाडी येथील महिलांचे लाठीकाठी, तलवारबाजी व दांडपट्टा प्रात्यक्षिकांनी सर्व मंत्रमुग्ध झाले.
यावेळी सौ. दाभोलकर म्हणाल्या, दुर्गामाता दौड ही एक धावण्याची दौड नसून तरुण पिढीमध्ये भक्ती, शक्ती, सुसंस्कार आणि धर्म जागृती निर्माण करण्याचे एक माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची, शौर्याची आणि विचारांची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा उद्देश्य या दुर्गादौडीचा आहे. या दौडीचे वैशिष्ट्य महिलांचे सक्षमीकरण, सशक्तिकरण आणि सबलीकरण आहे.
त्या व्यवसायाच्या अनुषंगाने बोलताना म्हणाल्या, महिला ही जीवनाचा आधार आहे. तिने स्वरोजगाराच्या दिशेने वाटचाल करताना शासनाच्या विविध योजना आहेत. याच विविध योजनांमध्ये शिवणकाम हा सुद्धा महत्वाचा घरबसल्या उपजीविका मिळवून देणारा व्यवसाय आहे. यासाठी भारत सरकार प्रणित महिला उद्योजकता विकास अभियान सेवाभावी संस्था प्रबोधन समिती, संजीवन उद्योग समूह तसेच शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक कला वैद्यकीय धर्मादाय व बौद्धिक अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने स्थापन केलेली आश्रय प्रतिष्ठान कुडाळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमानाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ दोन दिवसातच होत आहे.
संस्थापिका अध्यक्ष कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिकच्या डॉ. सुनीता मोडक या सर्व महिला शक्तीला संघटित करून सामाजिक दृष्ट्या सक्षम व सबलीकरण करणाऱ्यासाठी राज्यात काम करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घरी बसून शिवणकाम आणि घरबसल्या सन्मानाने कमवा तसेच गाव तिथे रोजगार ही संधी प्राप्त झाली आहे. यासाठी नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ नेतृत्ववान महिला ज्यांना स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्राची सन्मान सोहळा 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे. त्या सुद्धा आजच्या दुर्गामाता दौड मध्ये सहभागी झाल्या होत्या. ज्यांना या अभियानाचा भाग व्हायचा आहे त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही सौ. दाभोलकर यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








