
सिंधुदुर्गनगरी : बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि स्थिर कौटुंबिक वातावरण मिळावे, त्यांचे हक्क अबाधित राहावेत आणि त्यांचे योग्य संगोपन व पुनर्वसन व्हावे, यासाठी दत्तक प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अनाथ, परित्यक्त आणि समर्पित बालकांना दत्तक घेताना बालकाचे सर्वोत्तम हित, दत्तक पालकांची पात्रता, कागदपत्रांची पडताळणी आणि सक्षम प्राधिकाऱ्याची कायदेशीर मान्यता यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे इच्छुक दत्तक पालकांनी विहित कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ हा कायदा १५ जानेवारी २०१६ पासून लागू झाला. या कायद्यात बालकांची काळजी, संरक्षण, पुनर्वसन आणि दत्तक प्रक्रियेसंदर्भात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. भारतात केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) हे दत्तक प्रक्रियेचे नियमन करते. बाल न्याय अधिनियम, २०१५ आणि दत्तक विनियम, २०२२ नुसार दत्तक प्रक्रिया पार पाडली जाते.
दत्तक प्रक्रिया म्हणजे बालकाला कायदेशीररीत्या दत्तक पालकांच्या कुटुंबात कायमस्वरूपी स्थान देण्याची प्रक्रिया होय. या प्रक्रियेत बालकाच्या सुरक्षिततेला, भावनिक गरजांना, विकासाला आणि भविष्यातील हिताला प्राधान्य दिले जाते.
दत्तक पालकांची पात्रता
बाल न्याय अधिनियम, २०१५ मधील कलम ५७ आणि दत्तक विनियम, २०२२ मधील विनियम ५ नुसार दत्तक घेऊ इच्छिणारे पालक शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणे आवश्यक आहे. बालकाच्या संगोपनासाठी योग्य वातावरण उपलब्ध असावे. विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांची संमती आवश्यक असून, त्यांचे स्थिर वैवाहिक नाते किमान दोन वर्षांचे असणे गरजेचे आहे. नियमानुसार एकल व्यक्तीलाही बालक दत्तक घेता येते; मात्र एकल पुरुषाला मुलगी दत्तक घेता येत नाही. दत्तक पालकांचे वय, बालकाचे वय आणि इतर निर्धारित पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
दत्तक पालकांसाठी वयोमर्यादा
दत्तक विनियम, २०२२ मधील तरतुदींनुसार सर्वसाधारण दत्तक प्रक्रियेत बालकाचे वय शून्य ते दोन वर्षांपेक्षा कमी असल्यास पती-पत्नीचे एकत्रित कमाल वय ८५ वर्षे आणि एकल पालकाचे कमाल वय ४० वर्षे असावे. बालकाचे वय दोन ते चार वर्षांपेक्षा कमी असल्यास ही वयोमर्यादा अनुक्रमे ९० व ४५ वर्षे, चार ते आठ वर्षांपेक्षा कमी असल्यास १०० व ५० वर्षे, तर आठ ते १८ वर्षे वयोगटासाठी ११० व ५५ वर्षे आहे. बालक आणि दत्तक पालक यांच्यात किमान २५ वर्षांचे वयोअंतर असणे आवश्यक आहे. विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांचे एकत्रित वय विचारात घेतले जाते. नातेवाईकांच्या बालकाचे दत्तकविधान आणि सावत्र पालकांकडून दत्तक घेण्याच्या प्रकरणांत स्वतंत्र नियम लागू होतात.
नातेवाईकांच्या बालकाचे दत्तकविधान
नातेवाईकांच्या बालकाचे दत्तकविधान (Relative Adoption) आणि सावत्र पालकांकडून बालक दत्तक घेणे (Step-parent Adoption) या स्वतंत्र प्रक्रिया आहेत. अशा प्रकरणांमध्ये बाल न्याय अधिनियम, २०१५ आणि दत्तक विनियम, २०२२ मधील संबंधित तरतुदींनुसार प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नातेसंबंधाची पडताळणी, आवश्यक कागदपत्रे, संबंधित व्यक्तींची संमती आणि सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता यांना महत्त्व असते.
दत्तक प्रक्रियेचे प्रमुख टप्पे
इच्छुक दत्तक पालकांनी प्रथम केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या अधिकृत ऑनलाइन प्रणालीवर नोंदणी करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची व पात्रतेची पडताळणी, सामाजिक कार्यकर्त्यामार्फत गृहअभ्यास अहवाल तयार करणे, पात्रतेनुसार बालकाची निवड व जुळवणी, आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करणे आणि सक्षम प्राधिकाऱ्याकडून दत्तक आदेश प्राप्त करणे हे टप्पे पूर्ण करावे लागतात. दत्तक आदेशानंतर नियमानुसार बालकाचे जन्म प्रमाणपत्र तयार केले जाते. यासाठी CARA चे अधिकृत संकेतस्थळ आणि दत्तक नोंदणी पोर्टल यांचा वापर करता येतो.
कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई : बाल न्याय अधिनियम, २०१५ मधील कलम ८० नुसार, विहित प्रक्रियेचे पालन न करता अनाथ, परित्यक्त किंवा समर्पित बालक दत्तक देणे अथवा घेणे हा दंडनीय अपराध आहे. दोष सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, कलम ८१ नुसार बालकाची विक्री किंवा खरेदी केल्यास पाच वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. बालकाची प्रत्यक्ष जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून असा अपराध झाल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद लागू होऊ शकते. त्यामुळे बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अनधिकृत दत्तक व्यवहार टाळणे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.
दत्तक प्रक्रियेबाबत अधिक माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा.
“दत्तक घ्या कायदेशीर मार्गाने, बालकाचे भविष्य घडवा प्रेमाने!”
“कुटुंबासाठी बालक नाही, तर बालकासाठी कुटुंब!”
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








