
सावंतवाडी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालाईवाडा या मंडळाला १२१ वर्षांची परंपरा असून यंदाच्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत 'महा गणेशोत्सव' जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. गेल्या पाच वर्षांत तिन वेळा आम्हाला बक्षीस मिळाले. परंतु, यावेळी पुरस्कार देण्यासाठी आयोजकांनी घिसाडघाई केली. सांस्कृतिक मंत्र्यांना वेळ नव्हता अस ते म्हणाले. आतापर्यंतच्या अनुभवात हा पहिलाच वाईट अनुभव आम्हाला आला. त्यामुळे अचानक मुंबईत बोलावून घाईगडबडीत पुरस्कार देण्यापेक्षा जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते मंडळांना हे पुरस्कार प्रदान करण्यात यावे, अशी मागणी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य शासनाने, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यतरीय, जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. याचे बक्षीस वितरण 16 ऑक्टोबर 2026 रोजी पु. ल देशपांडे कला अकाडमी रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये जिल्हातरीय स्पर्धेत श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा, सावंतवाडी या मंडळाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या बक्षीसाचे स्वरूप 50 हजार रुपये, मान चिन्ह, व प्रशस्ती पत्रक असे होते. मात्र, यावर्षीचे पुरस्कार प्रदान करताना आयोजकांचा गोंधळ दिसून आला.
आदल्यादिवशी फोन करून आम्हाला मुंबईत येण्यासाठी सांगितले. ६०० किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मुंबई गाठली. एवढ्या लांबून जाऊन देखील अशाप्रकारे सन्मान होणं खटकणार होत. आतापर्यंतच्या अनुभवात ही पहिलीच घटना होती. यापूर्वी तिनं वेळा मंडळाला पुरस्कार मिळालेत. मात्र, अशी घटना घडलेली नव्हती.
माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे अशाच पद्धतीने पुरस्कार प्रदान करायचे असतील तर त्यापेक्षा हे पुरस्कार जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावावे व पालकमंत्र्यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात यावेत. त्यामुळे लोकांना होणारा त्रास, होणारा खर्च देखील टळेल. त्यामुळे याचा विचार करावा. कारण, वेळ नव्हता तर तारीख बदलून हा कार्यक्रम घ्यायला हवा होता. मंत्र्यांना वेळ नव्हता म्हणून आयोजकांकडून सांगितल गेलं. त्यामुळे याचा विचार आयोजकांनी यापुढे करावा अशी मागणी मंडळाचे उपाध्यक्ष अमरनाथ सावंत यांनी केली.
यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष राजू भाट म्हणाले, १२१ वर्ष आमच्या मंडळाला झाली असून पाच वर्ष आम्ही या स्पर्धेत सहभागी होत आहोत. तीन वेळा आम्ही पुरस्कार घेतला. पण, यावेळी सांस्कृतिक मंत्रालयाची घीसाडघाई दिसून आली. त्यामुळे लांबून आलेल्या व प्रवास केलेल्या सर्वच मंडळांनी नाराजी व्यक्त केली. एवढंच नव्हे तर कार्यक्रम संपताच सभागृहातील लाईट देखील बंद झाली.
सांस्कृतिक मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. मात्र, गोंधळ एवढा होता की त्यांच्याशी बोलणं देखील शक्य झालं नाही. त्यामुळे मंडळाच्या या मागणीच्या विचार आयोजकांनी करावा असं मत त्यांनी व्यक्त केल. तसेच गणेशोत्सवा दरम्यान मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार यांचे निधन झाले होते. गेली ४५ वर्ष त्यांनी मंडळासाठी योगदान दिले. त्यामुळे यावर्षीचा हा पुरस्कार त्यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सचिव साबाजी नार्वेकर यांनी यंदाचा पुरस्कार मिळाला यासाठी सर्व गणेशभक्तांना, मंडळाचे पदाधिकारी यांना धन्यवाद देतो. या मंडळाला एक वारसा आहे. १२१ वर्षांचं आमचं मंडळ असून मंडळाची स्वतःची इमारत आहे. माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी या इमारतीच्या नुतन सभागृहासाठी ५ लाखांचा निधी दिला होता, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. त्यांच नेहमीच सहकार्य आम्हाला मिळालं आहे. आमचं मंडळ केवळ
२१ दिवसांच्या उत्सवापुरत मर्यादित न राहता वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच काम आम्ही करत. त्यामुळे याचाही विचार कुठेतरी व्हावा असं मत मांडलं. यावेळी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाड मंडळाचे उपाध्यक्ष अमरनाथ सावंत, सचिव साबाजी नार्वेकर, उत्सव समिती अध्यक्ष राजू भाट, खजिनदार शिवप्रसाद बांदेकर, प्रतीक बांदेकर, सायली बांदेकर, विनोद सावंत, सुकन्या टोपले, प्रवीण मोरजकर, आबा पडते, कल्पना बांदेकर, मनोज सावंत, संतोष खानविलकर, प्रसाद नार्वेकर, अपर्णा भाट, मंगेश नानचे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








