
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मौजे नेरूर गोंधयाळे येथील धान्य गोदामात साठवलेल्या धान्याला मोठ्या प्रमाणात किडे (टोका) लागल्याने, परिसरातील नागरिक व ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्णराव सहारे यांना घेराव घातला.
धान्य गोदामातील धान्याला लागलेल्या किड्यांमुळे (टोका) परिसरातील लोकवस्तीत आणि घरांमध्ये किड्यांचा मोठा उपद्रव झाला आहे. यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी घरांमध्ये झोपणेदेखील कठीण झाले असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. "या किड्यांमुळे जनतेला होणारा नाहक त्रास का सहन करावा?" असा जाब विचारत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
घेराव आंदोलनादरम्यान संबंधित पुरवठा अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. याप्रकरणी संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी लावून कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. पावसकर यांनी यापूर्वी पत्राद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नेरूर गोंधयाळे धान्य गोदामातील किड्यांचा उपद्रव थांबवून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याची व त्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








