
सिंधुदुर्गनगरी : स्वतःच्या घरात होणारा सत्कार हा अन्य ठिकाणी होणाऱ्या सत्कारापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. सिंधुदुर्गच्या भूमिपुत्राने न्यायिक क्षेत्रात केलेल्या कामाचा जिल्ह्याला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या यशातून नव्या वकिलांना प्रेरणा मिळावी, यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश पी. ब्रम्हे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या सचिव तथा वरिष्ठ विधी सल्लागारपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिंधुदुर्गचे सुपुत्र लाडशेट (राकेश) दत्ताराम बिले यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे रविवारी (१८ ऑक्टोबर) सिंधुनिती जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून न्यायमूर्ती ब्रम्हे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. संग्राम देसाई, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांच्यासह न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाचा वकिलांना लाभ
प्रास्ताविकात ॲड. संग्राम देसाई यांनी कोल्हापूर खंडपीठाच्या कामकाजाचे महत्त्व विशद केले. न्यायमूर्ती ब्रम्हे यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाचे कामकाज विक्रमी गतीने सुरू असून, ग्रामीण व तालुकास्तरावरील वकिलांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा येथील वकिलांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनीही न्यायमूर्ती ब्रम्हे यांचे मार्गदर्शन जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
जिल्ह्याचे नाव उंचावणे हाच खरा सत्कार!
सत्काराला उत्तर देताना लाडशेट बिले म्हणाले, "माझा सत्कार व्हावा एवढे मोठे काम मी केलेले नाही. न्यायिक सेवेत केलेले काम हे माझे कर्तव्यच होते. आजचा सत्कार केवळ माझा नसून मला घडविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. जिल्ह्याचे नाव उंचावणे हाच माझा खरा सत्कार आहे."
वकील संघटनेमार्फत बांबर्डे येथे बंधारा
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत वकील संघटनेतर्फे वेताळ बांबर्डे येथे बंधारा बांधण्यात येणार आहे. या उपक्रमात न्यायमूर्ती ब्रम्हे सहभागी होणार असल्याची माहिती ॲड. देसाई यांनी दिली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








