
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोसच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार नीलेश राणे यांनी तीन महत्त्वाच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य नूतनीकरण, व्यापारी संकुलाचा पुनर्विकास आणि मालवण-ओरोस सिमेंट काँक्रीट रस्ता या कामांमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. या विकासकामांची माहिती शिंदेसेनेचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी प्रमुख काका कुडाळकर यांनी बुधवारी (२१ ऑक्टोंबर) जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शिंदेसेनेचे काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी ओरोस उपसरपंच पांडुरंग मालवणकर, नागेश ओरोसकर, प्रकाश देसाई, मदन परब, नीलेश ओरोसकर यांच्यासह व्यापारी संघ पदाधिकारी उपस्थित होते.
ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करून परिसराचा शिवसृष्टीच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. महामार्गाची उंची वाढल्याने पुतळ्याची भव्यता झाकोळली जात असल्याने तो महामार्गावरूनही स्पष्टपणे दिसावा, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सिंधुरत्न योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, सुशोभीकरणासह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत.
ओरोस येथील व्यापारी संकुलाचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. संकुलाचा विस्तार करून व्यापाऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना नव्या संकुलात सामावून घेण्याचे नियोजन आहे. या कामासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, मालवण ते ओरोस या मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या अर्थसाहाय्यातून सुमारे ३०५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळे पर्यटनासह जिल्ह्यातील दळणवळणाला चालना मिळणार आहे. आवश्यकतेनुसार रस्त्याची रुंदी सात, नऊ आणि चौदा फूट ठेवण्याचे नियोजन आहे.
वैभव नाईक यांच्या कार्यकाळावर टीका
मागील दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघ विकासापासून दूर राहिल्याचा आरोप करण्यात आला. या काळातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार नीलेश राणे प्रयत्नशील असून, ओरोससह संपूर्ण मतदारसंघाचा नियोजनबद्ध विकास करण्यावर भर दिला जात असल्याचा दावा काका कुडाळकर यांनी केला.








