
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी सावंतवाडी तालुक्यातील १३८ विविध विकासकामांसाठी ६ कोटी ६६ लाख रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, सभापती सुष्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, मायकल डिसोझा, जिल्हा परिषद पाणीपुरवठा अधिकारी संदेश राणे, आकाश कोल्हे, पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, सदा राणे, प्राजक्ता केळुसकर, श्रीमती कांबळी, उबाठा शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये आदी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक गावागावात, वाडी-वाडीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती, स्त्रोत बळकटीकरण, नवीन विंधन विहिरी, गाळ काढणे, विहिरींची खोली वाढवणे अशा कामांचा आराखडा तयार करा आणि चार दिवसात जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवा. त्यानंतर १५ दिवसात या आराखड्यावर सविस्तर चर्चा करून ती कामे मंजूर करून आणण्यासाठी उपाययोजना करू. आता दर पंधरा दिवसांनी ते महिनाभराने पाणी आढावा बैठक घेतली जाईल.
सादर करण्यात आलेल्या आराखड्यात नळ योजना विशेष दुरुस्ती - २३, तात्पुरती पूरक नळ योजना - १९, विंधन विहीर दुरुस्ती - ११, जलस्रोत बळकटीकरण - ३, नवीन विंधन विहिरी - ७३ आणि गाळ काढणे व विहीर खोलीकरण - ९ अशा एकूण १३८ कामांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पाणीपुरवठा विभागाचे अक्षय कोलगे यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








