
दोडामार्ग : दोडामार्ग मध्ये संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. मायनर कालव्यांची दुरुस्ती, पाणीशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करणे, गावनिहाय बैठका घेऊन पाणी अडविण्याचे नियोजन आणि सासोली येथील साइडवॉलचे काम पूर्ण करण्यावर भर द्यावा. शासकीय नियमांनुसार शक्य असलेल्या उपाययोजनांचा आराखडा दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येईल. तसेच वाढीव पाणीटंचाई निवारण आराखडाही पुन्हा सादर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, पं. स. सभापती पार्वती गवस, प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार राहुल गुरव, जि. प. सदस्य दीपक गवस व साक्षी तळवडेकर, तसेच पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, सोनिया कुबल व सायली निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील पाणीपुरवठ्याची सद्यःस्थिती, आगामी काळातील संभाव्य समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पाणीटंचाईचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात निर्माण होण्याची वाट न पाहता, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करून आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केसरकर यांनी प्रशासनाला दिल्या.
तिलारी कालव्याच्या पाण्यामुळे दिलासा; तरीही नियोजनावर भर
तिलारी कालव्याचे पाणी सातत्याने सुरू राहणार असल्याने दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवणार नाही, असा विश्वास आमदार केसरकर यांनी व्यक्त केला. मात्र, या शक्यतेवर अवलंबून न राहता पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
मायनर कालव्यांची आवश्यक दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय रोखणे, गरजेनुसार पाणीशुद्धीकरणाची व्यवस्था करणे, गावांमध्ये बैठका घेऊन पाणी अडविण्यासाठी योग्य ठिकाणे निश्चित करणे, तसेच सासोली येथील साइडवॉलचे काम पूर्ण करणे, या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. या उपाययोजनांमुळे उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.
कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान
जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी निधी आणि कामांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. ३१ ऑक्टोबर हा पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचा टप्पा असून, ३१ डिसेंबरपर्यंत आवश्यक प्राथमिक कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रस्तावित कामांसाठी केंद्र सरकारकडून ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे स्पष्ट करत उपलब्ध निधीतून कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय तातडीच्या अन्य उपाययोजनांसाठी अतिरिक्त २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही कामत यांनी स्पष्ट केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








