सावंतवाडी माठेवाडा नवरात्रोत्सवात रंगली कराओके गायन स्पर्धा

सम्राट क्लबचे कार्य कौतुकास्पद : बाबुराव कविटकर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 16, 2026 18:59 PM
views 15  views

सावंतवाडी : नव्या पिढीला संगीत, गायन, कला आणि संस्कृतीचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन करत आहे, असे प्रतिपादन सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांनी केले. सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील नवरात्रोत्सव मंडळाच्या व्यासपीठावर या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सम्राट संगीत सिताराचे अध्यक्ष नरेश पेडणेकर, ब्लॉक प्रेसिडेंट अर्जुन नाईक, सावंतवाडी टाऊनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे जिल्हाध्यक्ष तथा सम्राट क्लबचे खजिनदार सुनील राऊळ, सचिव प्रतिभा चव्हाण, कौस्तुभ पेडणेकर, डॉ. सोनल लेले, ॲड. सिद्धी परब, स्मिता केंकरे, गुरुप्रसाद चिटणीस, श्रुती सावंत, तसेच माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर गावडे, संतोष सावंत, दिलीप सांगावकर, बबलू मिशाळ,अमिषा सासोलकर, लक्ष्मीकांत सासोलकर वैभव केंकरे,यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सम्राट क्लब आणि सैनिक स्कूलच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना 'सम्राट संगीत सितारा २०२०' चे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांनी, संगीत, कला, साहित्य, संस्कृती आणि लोककलांचा प्रचार व प्रसार करण्यात सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन अत्यंत उत्तम काम करत असल्याचे सांगून गौरवोद्गार काढले, तर ब्लॉक प्रेसिडेंट अर्जुन नाईक यांनीही उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जिल्ह्यातील २२ कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षण ॲड. सिद्धी परब, स्मिता केंकरे आणि श्रुती सावंत यांनी केले, खुल्या गटातील अंतिम फेरीत दाखल झालेल्या या स्पर्धकांना आपल्या गायन कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करण्याची संधी या व्यासपीठावर मिळाली. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.