LIVE UPDATES

Sawantwadi Yoga Centre Safety Issue : मेडिटेशन सेंटरच्या कामात 'हाय टेन्शन' विजेच्या तारेचा अडथळा

ठेकेदारनं वेधलं माजी नगराध्यक्ष संजू परब यांच लक्ष : प्रशासनाच्या कारभारावर ओटले संजू परब यांनी ताशेरे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 19, 2026 15:28 PM
views 22  views
High-tension power line passing over the Meditation Yoga Centre construction site at Narendra Hill in Sawantwadi

सावंतवाडी : नगरपरिषद हद्दीतील नरेंद्र डोंगर येथील जागेवर सुरू असलेल्या 'मेडिटेशन योगा सेंटर'च्या कामाच्या ठिकाणी डोक्यावरून जाणाऱ्या हाय टेन्शन विद्युत वाहिनीमुळे कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करत ही धोकादायक वीज वाहिनी तातडीने हलवण्यात यावी, अशी मागणी ठेकेदारान मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच प्रशासनाला कळवून देखील कार्यवाही होत नसल्याने त्यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे खंत व्यक्त करत न्याय देण्याची मागणी केली आहे.

नगरपरिषदेच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर परिसरात मेडिटेशन योगा सेंटर विकसित करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सध्या या ठिकाणी पिलरच्या कॉलमसाठी सळ्यांच्या जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, कामाच्या जागेवरून थेट हाय टेन्शनची वीज वाहिनी जात असल्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॉलमसाठी सळ्या बांधत असताना या उंच सळ्यांचा वरून गेलेल्या हाय टेन्शन तारेला स्पर्श होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा स्पर्श झाल्यास कामावर असलेल्या मजुरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो‌. या गंभीर समस्येकडे नगरपरिषदेचे यापूर्वीही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अद्याप ही विद्युत वाहिनी हलवण्यात आलेली नाही. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न संवेदनशील असून अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल ठेकेदाराने उपस्थित केला आहे.

मुख्याधिकारी यांना पत्र देत माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे आपली कैफियत मांडत न्याय देण्यासाठी मागणी केली आहे‌‌. तातडीने गंभीर दखल घ्यावी आणि महावितरण विभागाला हाय टेन्शन वीज वाहिनी लवकरात लवकर हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी ठेकेदारान केली आहे. 

दरम्यान, संजू परब यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून बांधकाम करण्यापूर्वी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना नव्हती का ? प्रशासनाचा एकुणच कारभार हा अनागोंदी असून या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे याकडे लक्ष वेधून न्याय मिळवून देणार असल्याचा विश्वास श्री. परब यांनी दिला आहे.