
कुडाळ : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नेरूर दिरबाई तलाव ते नेरूर पार कर्ली खाडीला जोडणाऱ्या ओहोळातील गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम गेल्या दोन वर्षांपासून हाती घेण्यात आले होते. एकूण ५ किलोमीटर लांबीच्या या ओहोळातील ३.५ किलोमीटरचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, यामुळे परिसरातील भीषण पाणीटंचाई कायमची दूर होण्यास मदत झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून या ओहोळातील गाळ काढून त्याची खोली वाढवण्यात यावी, अशी आग्रही मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात होती. ग्रामस्थांची ही अडचण आणि गरज ओळखून आमदार निलेश राणे यांनी तात्काळ दखल घेत गाळ काढण्याची मोहीम राबवली.
गाळ उपशामुळे हा ओहोळ चांगलाच खोल झाला असून, त्याची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्याच्या कडक उन्हाळ्यात अनेक विहिरी कोरड्या पडल्या असून त्यांचा तळ दिसत असताना, दुसरीकडे हा ओहोळ तब्बल ३ किलोमीटरपर्यंत पाण्याने तुडुंब भरलेला आहे.
या मुबलक पाणीसाठ्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटणार असून, आगामी काळात उद्भवणारी भीषण पाणीटंचाई टाळणार आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावून परिसराला मोठा दिलासा दिल्याबद्दल सर्व शेतकरी, बागायतदार आणि नेरूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे मनापासून जाहीर आभार मानण्यात येत आहेत.








