LIVE UPDATES

आई-वडीलांच्या स्मरणार्थ जि.प. शाळेला 'स्मार्ट टीव्ही'

जि.प. शाळा क्र. ५ मध्ये माजी विद्यार्थींचा मेळावा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 17:41 PM
views 28  views

सावंतवाडी : शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून सावंतवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ मध्ये सरस्वती पूजनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी अमोल टेंबकर यांनी आपले आई-वडील कै. मंदा व मंगेश टेंबकर यांच्या स्मरणार्थ शाळेला 'स्मार्ट टीव्ही' भेट स्वरूपात दिला. इतरही माजी विद्यार्थ्यांनीही यावेळी शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुमलता सुकी यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. यावेळी उपशिक्षिका उषा पावसकर, सिद्धी मराठे, माजी केंद्रप्रमुख तथा माजी विद्यार्थी रविंद्र गवस, सम्राट क्लबचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, भुवन नाईक, अक्षय माशाळ, रंजना निर्मळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अर्चना शिरोडकर, विजय वाडकर, सदस्य श्रीपाद नाईकवाडे यांच्यासह पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचा विद्यार्थी मुख्यमंत्री प्रतीक म्हाडगुत याने मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची संघटना उभारणार

शाळेला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याध्यापिका सुकी यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद प्रशासनाकडूनही शाळेच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न असून, यासाठी शाळास्तरावर माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात येणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून शाळेच्या आवश्यक सुविधांसाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालये, सीसीटीव्ही यंत्रणा, वॉटर प्युरिफायर, स्मार्ट टीव्ही, हात धुण्याची सुविधा आणि शाळेसमोर बाग विकसित करणे अशा विविध मागण्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

मेळाव्यात झालेल्या चर्चेदरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आपल्या परीने शाळेसाठी योगदान देण्याची तयारी दर्शवली. अमोल टेंबकर यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिला. माजी विद्यार्थी रविंद्र गवस यांनी वॉटर प्युरिफायर देण्याचे मान्य केले, तर मुनाफ शेख यांनी १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. नगरसेविका वीणा जाधव यांनी शाळेला चार घड्याळे देणार असल्याचे जाहीर केले.

शाळेच्या इतर आवश्यक मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातूनही ही शाळा दत्तक घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या शाळेशी असलेले नाते जपत मदतीसाठी पुढाकार घेतल्याने शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. एकजुटीने केलेले प्रयत्न, पालकांचे सहकार्य आणि माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर सावंतवाडीच्या पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ ला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.


ताजी बातमी

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
October 17, 2026
संबंधित बातम्या

View all

समान काम, समान वेतनासाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन!
October 17, 2026
कोनशी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
October 17, 2026
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण
October 17, 2026
कलंबिस्तमध्ये वाचक प्रेरणा दिन, माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
October 17, 2026