LIVE UPDATES

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण

लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांचे श्रमदान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 17, 2026 17:56 PM
views 33  views

वेंगुर्ला : बदलत्या हवामानामुळे उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई आणि भूजल पातळी खालावण्याचा धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ सुरू आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण करण्यात आला असून, यामध्ये लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही आजच्या काळाची गरज ओळखून प्रशासकीय पातळीवर राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे.

जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून ती एक लोकचळवळ व्हावी, हा संदेश देत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने स्वतः मैदानात उतरून श्रमदान केले. या मोहिमेत नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष काम केले.

या श्रमदान मोहिमेत क्रीडा व सांस्कृतिक सभापती सचिन शेटये, बांधकाम सभापती प्रणव वायंगणकर, स्वच्छता व आरोग्य सभापती गौरी माईणकर, नगरसेवक संदेश निकम, प्रशांत आपटे, सदानंद गिरप, प्रितम सावंत, तसेच नगरसेविका सुमन निकम, सुषमा प्रभुखानोलकर, शीतल आंगचेकर, समिधा रेडकर आणि लीना म्हापणकर यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वतः हातात घमेले-फावडे घेऊन श्रमदान केले. 

सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती-वाळू भरून हा पारंपारिक व कमी खर्चाचा वनराई बंधारा उभारण्यात आला.  या जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जाणवणाऱ्या संभाव्य टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आणि बिगर-पावसाळी हंगामात पाण्याचे नियोजन करण्यासाठी हा वनराई बंधारा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.