LIVE UPDATES

वन्यप्राण्यांकडून शेती ,फळबागांचे नुकसान

बांबर्डेतील बाधित शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका ; बेमुदत उपोषणाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 10:30 AM
views 8  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

दोडामार्ग : वन्यप्राण्यांकडून शेती व फळबागांचे होणारे नुकसान, नुकसानभरपाई देण्यास होणारी दिरंगाई, पंचनाम्यांमध्ये फेरफार आणि वनविभागाच्या विविध योजनांमधील गैरव्यवहारांविरोधात बांबर्डे येथील बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दौलत राणे, मदन राणे व सिद्धेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्यात वन्य हत्ती, रानडुक्कर, गवे, माकडे, साळिंदर आदी वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. भातशेतीसह काजू, नारळ, सुपारी, केळी आणि अन्य फळपिकांना वन्यप्राण्यांचा फटका बसत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वर्षानुवर्षे हा प्रश्न कायम असतानाही वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

नुकसानभरपाईत दिरंगाई; पंचनाम्यांत फेरफार केल्याचा आरोप

 वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असून ती वेळेत दिली जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. नियमानुसार पंचनाम्यानंतर ३० दिवसांच्या आत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असताना त्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यास अधिकारी व वनरक्षकांकडून दिरंगाई केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

  तलाठी, कृषी सहाय्यक आणि वनरक्षक यांच्या स्वाक्षऱ्यांसह झालेल्या त्रिस्तरीय पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांची परवानगी न घेता व्हाईटनरचा वापर करून किंवा अन्य प्रकारे फेरफार केल्याने नुकसानभरपाईच्या रकमेत बदल झाल्याचा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

योजनांवरील खर्चावर प्रश्नचिन्ह

  वृक्षलागवड, वनबंधारे, वनतळी, सोलर फेन्सिंग, जाळरेषा, हत्तींचा वावर रोखण्यासाठी खोदलेले खंदक, चर, गस्तीसाठी वाहने आणि हत्तींच्या बंदोबस्तासाठी नियुक्त केलेले हाकारे अशा विविध उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखवले जात असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या योजनांचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याने खर्चाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या योजनांच्या अंमलबजावणीत गैरव्यवहार झाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

राखीव वनक्षेत्रातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर

 दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोडीवर निर्बंध असतानाही बांबर्डे राखीव वनक्षेत्रात साग, शिसम, तसेच बांबर्डे आणि दोडामार्ग परिसरातील वनक्षेत्रात खैर व अन्य मौल्यवान वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तोडलेल्या लाकडाची विनापरवाना वाहतूक होत असून वनक्षेत्रातील चेकनाक्यांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रकरणात वनविभागातील संबंधित यंत्रणा आणि लाकूडतस्कर यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागवूनही तीन महिन्यांपासून माहिती दिली जात नसल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

 वन्य हत्तींसह अन्य वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. नुकसानीचे पंचनामे करून नियमानुसार ३० दिवसांच्या आत नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच वनविभागाच्या योजनांमधील गैरव्यवहार, बेकायदेशीर वृक्षतोड, माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ आणि पंचनाम्यांतील फेरफार यांची चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पदभारावरून दूर करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. २१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणामुळे उद्भवणारी परिस्थिती, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न यासाठी वनविभाग व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.