
कणकवली : कणकवली शहरात सोमवारी पाच विकासकामांची भूमिपूजने झाली. या सर्व कामांना मिळून १ कोटी ७६ लाख रुपये एवढा निधी मंजूर असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. नगरपंचायतीच्या वतीने २ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आल्याचेही पारकर यांनी सांगितले
येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक बाळू पारकर, लुकेश कांबळे, संकेत नाईक, जयेश धुमाळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, जाई मुरकर यांच्यासह रामदास मांजरेकर, हरेश निखार्गे, वैभव मालंडकर आदी उपस्थित होते.
पारकर म्हणाले, कणकवली शहरामध्ये पाच कामांची भूमिपूजनने पार पडली. यामध्ये रस्ता रुंदीकरणष काँक्रिटीकरण, गटार अशा कामांचा समावेश आहे. शहराच्या सर्व १७ प्रभागांमध्ये विकास कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर मिळवून २८ कोटींच्या कामांची यादी आम्ही दिली आहे. लवकरच हा निधी देखील प्राप्त होईल. कणकवलीवासीयांनी सत्ता दिल्यानंतर गेल्या आठ महिन्यांमध्ये आम्ही अनेक ठराव केले. त्यानुसार आता विकास कामांना देखील सुरुवात झाली आहे यापूर्वीच साडेअकरा कोटी रुपये काँक्रिटीकरण कामासाठी तसेच दीड कोटीचा निधी प्रसाधनगृहासाठी प्राप्त झाला आहे, असेही पारकर म्हणाले.
नगरपंचायत निवडणुकीच्या आधी करण्यात आलेल्या 21 निविदा आम्ही सत्तेत आल्यानंतर रद्द केल्या होत्या. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्यावतीने लवकरच जाहीर होईल. या 21 कोटींमधील काम नाही लवकरच सुरुवात होईल, असेही पारकर यांनी सांगितले.
लवकरच 'नगराध्यक्ष आपल्या दारी'
कणकवली शहराच्या विकासाची जबाबदारी कणकवलीवासीयांनी आठ महिन्यांपूर्वी आमच्याकडे दिली. विकासाच्या प्रक्रियेत कणकवलीकर नागरिकांसह विरोधी पक्षाचे हे तेवढेच सहकार्य अपेक्षित आहे. कणकवली शहराच्या नागरिकांच्या विकासाच्या संकल्पना समजून घेता याव्यात, या उद्देशाने येत्या काळात नगराध्यक्ष आपल्या दारी ही मोहीम देखील राबविण्यात असल्याचे पारकर यांनी सांगितले.
दिवाळी बाजाराचे आयोजन
कणकवली शहरातील बचत गटाच्या महिलांना व्यासपीठ मिळावे, शहरातील स्थानिक उत्पादकांना संधी मिळावी, या उद्देशाने यावर्षी प्रथमच नगरपंचायतीतर्फे दिवाळी बाजाराचे आयोजन करत आहोत. दिवाळी बाजार २ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे उड्डाणपूल खालील जागेत होणार आहे. दिवाळी बाजारात ३० स्टॉल्स असणार आहेत. स्टॉलसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इच्छुकांनी आमचे सर्व नगरसेवक अथवा नगरपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पारकर यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








