
देवगड : येत्या हंगामात पडू शकणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि बागायतदारांच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यासाठी देवगड तालुका आंबा-काजू बागायतदार संघटनेची बैठक जामसंडे येथे पार पडली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी शेतकरी हिताच्या दृष्टीने विविध भूमिका मांडल्या.
या बैठकीत औषध खरेदीचा मुद्दा प्रमुख ठरला. देवगडमधील औषध विक्रेत्यांनी उधारीवर औषधे देणे बंद केल्याच्या निर्णयावर चर्चा झाली. ज्या शेतकऱ्यांची जुनी बिले थकीत आहेत, त्यांनी यापुढे देवगडमधील संबंधित दुकानदारांकडून रोखीनेही खरेदी न करता तालुक्याबाहेरून किंवा जिल्ह्याबाहेरून औषधे खरेदी करावीत, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले. मागील वर्षांचे पैसे द्यायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असून, संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असे ढोके यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, दुकानांमधील बोगस औषधविक्री आणि अनधिकृत गोदामांवर कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या वेळी लागणाऱ्या 'शेतकरी दाखल्या'च्या नावाखाली काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कथित आर्थिक लुटीची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे जाहीर झालेली ५० टक्के भरपाई अद्याप अनेक बागायतदारांच्या खात्यात जमा झालेली नाही, ती लवकरात लवकर जमा करावी. तसेच बाफर्डे आणि देवगडमधील 'अ' प्रभागातील वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा त्वरित मिळावा, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








