LIVE UPDATES

कुडाळ MIDC परिसरात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

मद्यपी वाहनचालकांचे धाबे दणाणले | बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा चाप
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 18, 2026 16:28 PM
views 97  views

कुडाळ :  कुडाळ MIDC परिसरात काल रात्री जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने धडक आणि कडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. रात्री ८ वाजल्यापासून पोलिसांनी अचानक नाकाबंदी करत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे नशा करून बेजबाबदारपणे वाहने चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

MIDC परिसरात रात्रीच्या वेळी नशा करून वाहने चालवण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आणि अपघात टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कुडाळ वेंगुर्ला रस्त्यांवर नाकाबंदी लावली. या दरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची कडक तपासणी करण्यात आली. संशयित चालकांची 'ब्रेथ ॲनालायझर' उपकरणाद्वारे तपासणी करून मद्यप्राशन केलेल्या चालकांवर जागेवरच दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या कारवाईमुळे नशा करून सुसाट वाहने पळवणाऱ्या बेशिस्त चालकांना चांगलाच चाप बसणार असून, स्थानिक नागरिकांतून पोलिसांच्या या धडक मोहिमेचे स्वागत केले जात आहे. आगामी काळातही अशा प्रकारची तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

जिल्हा वाहतूक शाखेच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हवालदार (HC 32) महेंद्र देऊळकर, पोलीस कॉन्स्टेबल (PC 242) कांदळगावकर, पोलीस कॉन्स्टेबल (PC 197) पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल (PC 924) शरडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.