
वैभववाडी : भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा यांचा सुरेख संगम साधत गडमठ येथील श्रुती संतोष सुतार यांनी मातीच्या पणत्यांवर नवदुर्गांची नऊ रूपे साकारली आहेत. अवघ्या दीड ते दोन सेंटीमीटर उंचीच्या पणत्यांवर ॲक्रेलिक रंगांच्या माध्यमातून नवदुर्गांची विविध रूपे रेखाटत त्यांनी सूक्ष्म चित्रकलेचा अनोखा आविष्कार घडविला आहे. नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात त्यांच्या या कलाकृतीतून देवीभक्ती आणि कलात्मकतेचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.
भारतीय संस्कृतीत मातीच्या पणतीला विशेष महत्त्व आहे. पणतीचा प्रकाश अंधःकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि निराशेतून आशेकडे जाण्याची प्रेरणा देतो. नवरात्रीतील अखंड ज्योत ही निरंतर श्रद्धा, भक्ती आणि मांगल्याचे प्रतीक मानली जाते. याच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतून प्रेरणा घेत श्रुती सुतार यांनी मातीच्या नऊ पणत्यांवर आदिशक्तीच्या नऊ स्वरूपांचे चित्रण केले आहे.या कलासंकल्पनेत नऊ पणत्या म्हणजे नवदुर्गांची नऊ दिव्य रूपे, त्यांवरील चित्रे म्हणजे कलेतून व्यक्त झालेली देवीभक्ती, तर अखंड ज्योत म्हणजे निरंतर श्रद्धेचा प्रकाश, असा प्रतीकात्मक अर्थ त्यांनी मांडला आहे. माती, रंग आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत त्यांनी या कलाकृतीतून भारतीय संस्कृतीशी असलेले नाते अधोरेखित केले आहे.
सूक्ष्म चित्रकलेतून साकारल्या अनेक कलाकृती
श्रुती संतोष सुतार यांनी यापूर्वीही विविध माध्यमांवर सूक्ष्म चित्रकलेचा अनोखा आविष्कार साकारला आहे. रुईच्या पानावर हनुमान, गंधगोळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण, मोरपिसावर श्रीकृष्ण, सूक्ष्म टिकलीवर नवदुर्गांची नऊ रूपे, तसेच सूक्ष्म टिकलीवर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे चित्र त्यांनी रेखाटले आहे. याशिवाय वीणेवर विठ्ठल-रुक्मिणी आणि बासरीवर श्रीकृष्ण यांची चित्रे साकारून त्यांनी आपल्या कल्पकतेची वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या या कलाकृती केवळ कलात्मक कौशल्याचे दर्शन घडवणाऱ्या नसून त्यातून धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक जाणीव यांचाही प्रत्यय येतो. पारंपरिक वस्तूंना चित्रकलेच्या माध्यमातून वेगळे रूप देत भारतीय संस्कृतीतील विविध प्रतीके जिवंत करण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








