LIVE UPDATES

युवतीचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 18, 2026 10:16 AM
views 1139  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कुडाळ : कुडाळ तालुक्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कुडाळ येथे एका २३ वर्षीय युवती दामिनी पालव हिच्यावर  दिनांक 17 रोजी धारदार चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी संशयित आरोपीला  वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून साहिल विश्राम धुरी या तरुणाला  रात्री ताब्यात घेतले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही कुडाळ येथील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षण घेत होती. लवकरच ती कामानिमित्त मुंबई येथे जाणार होती. काल संध्याकाळी ती कुडाळ येथून बसने कडावल येथे उतरली. त्यानंतर रोजच्याप्रमाणे ती कडावल-वर्दे मार्गाने चालत आपल्या घराच्या दिशेने जात होती.

दरम्यान, कडावल-वर्दे मार्गावरील वर्दे ब्रिज येथे  संशयित युवकाने तिला गाठले. आरोपीने तिला ओहळाच्या कडेला बोलवून नेले आणि तिच्यावर धारदार शस्त्राने  वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

संशयित आरोपी ताब्यात

या घटनेतील संशयित युवक हा 'मठ' येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कौशल्यपूर्वक आणि वेगाने कारवाई करत संशयिताला काल रात्रीच ताब्यात घेतले आहे.